Wednesday, 30 December 2015

वाह!

प्रभात समयी रवि किरणांनी
खुशाल चादर ओढून न्यावी
गर्द काजळी निशिरंगांची
सुप्त झोपल्या धरणी वरुनी ।

निळी निळाई उजळूनी यावी
क्षितीजावरी चांदी पसरावी
पुन्हा पाखरे घेत भरारी
सांतही गगना पल्याड जावी ।

तसेच काही होते रसिका ,
"वाह!" तुझी जेव्हा बघ येते
सुप्त झोपल्या प्रतिभेची मग
जणू चमचमती प्रभात होते ।

- कल्याणी कुलकर्णी
११:०६ सकाळी
३० / १२ / २०१५ 

Tuesday, 9 June 2015

विरह



मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार
माझ्या आठवणीत साऱ्या जगाला विसरत असणार

ते तळ, जिथे आपण भेटायचो
ते झाड, ज्याच्या सावलीत तासनतास बसायचो
आपल्या भेटीची साक्ष देत, अजूनही तिथेच असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

तू वेडापिसा झालास कि, ते झाडही थरथरत
तुला सहानुभूती म्हणून, अस्वस्थपणे सळसळत
माझ्या येण्याची वाट, ते हि नक्कीच पाहत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

फुलपाखरे पाहून तुला, माझे डोळे आठवतात
वार्याच्या झुळूकेत तुला, माझ्या हसण्याचे भास होतात
तुझ्या हाताला माझ्या तळव्याचे, स्पर्श नक्कीच जाणवत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

~~* कल्याणी *~~

Wednesday, 6 August 2014

अनामिका


माझ्याच कवितेला मीच त्रयस्थपणे पाहिल्यानंतर सुचलेले हे विचार..
शीर्षक काय देऊ? कविता? कल्पना? की प्रतिभा?
---------------------------------------------------------------------------------------
शब्द शब्द गुंफूनी
हे काव्य कैसे प्रसवले?
भाव माझे शब्द तुझे
एक कैसे जाहले?

 
स्पंदने माझ्या मनाची
तू कशी ग जाणीली?
हाक माझ्या अंतरीची
तू कशी हुंकारीली?

तू सखी तू..?
तू परी तू..?
की भुलवी मजला आसरा..!

तू खरी तू..?
वसशी कुठे तू...?
की फक्त माझी कल्पना..!

-कल्याणी (निकिता)

ओढ

जवळपास एका वर्षानंतर काहीतरी लिहिलंय. जरा  अपक्व वाटेल पण गोड मानून घ्या.
कविता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या धाटणी ची आहे. ओवी प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील तर नक्की दाखवा .
------------------------------------------------------------------------------------------------------

मन बेभान बेभान , उगा विचलित होई ।
सातासमुद्रापल्याड, दूर देशामध्ये जाई ।।

अरे थांब रे रे मना , नको जाऊ असा दूर ।
डोळ्यातून बरसेल, पाऊस तो झरझर ।।

कशी आवरू रे त्याला, किती विनवणी केली ।
दूर देशी रे साजन , मना ओढ ती लागली ।। 

- कल्याणी
०५-०८-२०१४
पहाटे १:१५

Monday, 4 August 2014

यादे

तेरी याद मे सुबेह शाम पिता हू..
गम के प्यालो को मय के घुंट समझ कर..
गर्दीश मे चढता है मुझे नशा तेरी यादोंका...
जिता हू उसिमे ख्वाबोकी दुनिया बनाकर..

Tuesday, 1 January 2013

शेकरा.

झुपकेदार  शेपूट, गुंजेसारखे  लाल डोळे अन रामाची बोटे मिरवणारी खारुताई .. कुठेही दिसली तरी लक्ष वेधून घेणारी..

त्याच जातीतली मोठी, रानात राहणारी खार म्हणजे शेकरा. 
या  शेकाऱ्याचा थाट  पण कुणा राजापेक्षा कमी नसतो बरं का .. रानभर हिंडा, दिसेल ते फळ खा किंवा नुसते चाखून टाकून  द्या ..
हवे तिथे घरटे बनवा .. वाटेल तिथे राहा.. अशी उनाड जीवनशैली .. 
आणि विशेष म्हणजे ..अंगच्या चपळतेमुळे फारशी कुणाची भीती नाही म्हणून अंगी शिरलेली मस्ती .. असा हा शेकरा.

विशिष्ठ असा इशारा देऊन लहान सहान प्राण्यांना मोठ्या श्वापदांपासून वाचवणारा .. तर कधी उगाचच गोन्धळात टाकणारा .
पण काहीही झाले तरी राहत्या वनाशी, पोसणाऱ्या मातीशी सदैव इमानी असलेला. शेवटपर्यंत रानाची सोबत करणारा.

विलक्षण अशा कथा आहेत रणजीत देसाई यांच्या 'शेकरा ' कथावलीत.
या अति चंचल वल्ली शेकाऱ्याच्या मनात शिरून अगदी नेटकेपणे मांडलेल्या..

~~* कल्याणी *~~