तशी 'त्या'ची आणि माझी ओळख अगदी लहानपणी ची. जसं कळायला लागलं तसा तो ही माहीत झाला.. घरात सगळ्यांना आवडायचा ना..
पण खरं सांगू आई बाबांनी लहानपणी साधी तोंडओळख पण करून नाही दिली त्याची मी 10 12 वर्षांची होई तो..
मग कधीतरी एखाद्या लग्न समारंभात.. किंवा सहलीमध्ये तो भेटायचा..
तशीच त्याची थोडीशी ओळख झालेली..
जरा मोठे झाल्यावर म्हणजे कॉलेजला गेल्यावर तो नियमित भेटायला लागला..
तो असला की मित्र मैत्रिणींच्या गप्पांना अजूनच रंगत यायची.. आहेच तो तसा.. नुसत्या येण्यानेच सगळं वातावरण उत्साही करून टाकणारा..
तेव्हा त्याच्या एका अगदी घनिष्ठ मैत्रिणीची पण ओळख झाली..
जसे राम सीता, राधा कृष्ण.. तसे तो आणि ती.. त्याचं नाव क्वचितच वेगवेगळं घेतलं जातं..
हा जसा सदाबहार.. सगळ्यांशी मैत्री करणारा.. सगळ्यांना आपला वाटणारा.. तशी ती नाही मात्र. तिचा स्वभाव जरा मानी.. आणि जरा जास्तच ' भाव ' खाणारी.. त्यामुळे ती काही अगदी सर्वांनाच आवडेल अशी नाही.. पण असो.. अस्मादिकांची गट्टी मात्र त्याच्याशीच जास्त..
जरा पुढे नोकरी वगैरे लागल्यावर तो अगदी न चुकता.. रोजच हवा असायचा.. सकाळी.. ऑफिसात.. घरी येताना.. अनेक वेळा भेटायचा..
कधी कामाचं प्रेशर असेल.. किंवा कधी उगाच जरा निवांत वेळ आहे म्हणून.. कधी उगाचच low वाटतंय म्हणून.. तर कधी.. बाहेर छान पाऊस पडतोय म्हणून.. कधी आवडती व्यक्ती अजून जरा वेळ थांबावी म्हणून.. तर कधी मनातलं मोकळेपणाने बोलता यावं म्हणून..
कधी सगळेच जमलेत तर तो ही हवाच म्हणून..
कधी आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य नीट व्हावं म्हणून..
कधी मोठ्या मोठ्या चर्चांना गती मिळावी म्हणून.. तर कधी उगाच थोडा ब्रेक म्हणून..
कधी सहज.. तर कधी उत्स्फूर्तपणे..
तो बोलावला जायचा.. नी तो ही अगदी तत्परतेने उपस्थित असायचा...
असं करता करता आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि पुढे व्यसनात कधी झालं कळलंच नाही..
मग तो भेटला नाही की जीव कासावीस व्हायला लागला.. चुकचुकल्या सारखं वाटायला लागलं.. काहीही सुचेनासे व्हायला लागलं..
तेव्हा ठरवलं.. आता पुरे.. हे थांबायला हवे..
त्याची गोडी हळू हळू कमी करायचं ठरलं.. त्याने त्याचा गोल्डन.. तपकिरी रंग घालवून अगदी काळा कुळकुळीत केला आणि कितीही कडवटपणा आणला तरीही.. तरीही त्याची आवड काही कमी झाली नाही..
त्याच्या मैत्रिणीशी ओळख वाढवावी का? असाही विचार आला.. पण त्याच्यापेक्षा तिची मैत्री अधिक toxic असं खूप लोकांकडून ऐकलं.. म्हणून ठरवलं नकोच तो मार्ग..
अरे.. थांबा.. थांबा.. काय विचार करताय??
पहा त्याच्या बद्दल बोलताना मी अशी वहावत गेले की त्याच नाव देखील नाही सांगितलं..
अहो तो.. "चहा" आणि ती.. "कॉफी"!
टाकू का लगेच.. अर्धा अर्धा कप?
- कल्याणी
०६-१०-२०२५
पहाटे ३:४५





