Showing posts with label ranjit desai. Show all posts
Showing posts with label ranjit desai. Show all posts

Tuesday, 1 January 2013

शेकरा.

झुपकेदार  शेपूट, गुंजेसारखे  लाल डोळे अन रामाची बोटे मिरवणारी खारुताई .. कुठेही दिसली तरी लक्ष वेधून घेणारी..

त्याच जातीतली मोठी, रानात राहणारी खार म्हणजे शेकरा. 
या  शेकाऱ्याचा थाट  पण कुणा राजापेक्षा कमी नसतो बरं का .. रानभर हिंडा, दिसेल ते फळ खा किंवा नुसते चाखून टाकून  द्या ..
हवे तिथे घरटे बनवा .. वाटेल तिथे राहा.. अशी उनाड जीवनशैली .. 
आणि विशेष म्हणजे ..अंगच्या चपळतेमुळे फारशी कुणाची भीती नाही म्हणून अंगी शिरलेली मस्ती .. असा हा शेकरा.

विशिष्ठ असा इशारा देऊन लहान सहान प्राण्यांना मोठ्या श्वापदांपासून वाचवणारा .. तर कधी उगाचच गोन्धळात टाकणारा .
पण काहीही झाले तरी राहत्या वनाशी, पोसणाऱ्या मातीशी सदैव इमानी असलेला. शेवटपर्यंत रानाची सोबत करणारा.

विलक्षण अशा कथा आहेत रणजीत देसाई यांच्या 'शेकरा ' कथावलीत.
या अति चंचल वल्ली शेकाऱ्याच्या मनात शिरून अगदी नेटकेपणे मांडलेल्या..

~~* कल्याणी *~~

Tuesday, 11 September 2012

मेख मोगरी

" मेख मोगरी " नावंच खूप आकर्षक वाटलं..!

कुठे तरी भिंतीवर किंवा दारावर ठोकलेली मेख जिचा आणि सौंदर्याचा दूर दूर वर काही संबंध नाही अशी ,
अन टप्पोऱ्या मोत्यांची चकाकणारी, लक्षवेधी, मनास भुरळ पडणारी, कुणा वीराच्या भरजरी पोशाखावर किंवा ललनेच्या शृंगारात सजणारी मोगरी..


  मेख तशी असते कठीण दिसायला ती ठोकली कुठे तर खोलवर जाणारी,
अन जर काढली बाहेर तर कधीही भरून न निघणारी फट  मागे सोडून जाणारी .
 

उलट मोगरी नुसतीच सजवण्याच्या, नटण्याच्या कामाची. पण असेल तिथे लक्ष वेधून घेणारी, किंवा साज शृंगारात हटकून आपला वेगळा स्थान निर्माण करणारी.


यातल्या  व्यक्ती पण अशाच आहेत, कुणी मेखेप्रमाणे कठीण कडक पण मनावर छाप सोडून जाणाऱ्या
अन कुणी उगाच मोगरीसारखी, हटकून स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या, कथेतल्या मुख्य
पात्रासोबत त्यांचा पण विचार करायला लावणाऱ्या..

आता या अशा दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती कशा कुठे एका कथेत गुंफल्या जातात, मेख आणि मोगरीचा  संगम कसा आणि कुठे बरे होतो..
 ते मात्र मी सांगणार नाही हं मुळीच, त्यासाठी मात्र रणजित देसाईच  हे पुस्तकच वाचायला हवं.

~~* कल्याणी *~~




Sunday, 2 September 2012

मधुमती


"रुपमहाल" नंतर थांबावस वाटत नव्हतं म्हणून "मधुमती" हि वाचायला घेतला आणि एका वेगळ्याच जगात प्रवास करून आल्याचा आनंद पुन्हा अनुभवला.
म्हणून हा लेखनप्रपंच.

मधुमती 


सौन्दर्य अन जोडीला खानदानी गायकीची परंपरा जपणाऱ्या, मधुर गळा आणि मदिरा यांची अधिराणी समजल्या जाणाऱ्या नायकीनिंच्या वेगवेगळ्या ढंगात रंगात नटलेली रणजित देसाईंची "मधुमती"..

    नायकीनि या केवळ  शौकीन लोकांना मोहित करून त्यंच्या पैशांवर ताबा मिळवून छान-छोकीत राहणाऱ्या किंवा एक तर रंगेल किंवा कलासक्त राजाच्या दरबारी "सेवेस"  स्त्रिया असतात हा जनापवाद स्पष्टपणे खोडून काढणारी हि कथावली. 
एवढ्या नजाकतीने प्रत्येक कथेतली सौन्दर्यवती वर्णिली गेली आहे कि वाचता वाचता ती साक्षात पुढे उभी असल्याचा भास होतो.
या शृंगारिक वर्णनासोबतच यातल्या प्रत्येक कथेला एका वेगळ्याच नाट्याची झालर आहे. 
कधी कुणा वारांगानेला पित्याच्या प्रेमाची झलक दाखवून जाणारा कुणी प्रवासी भेटतो, कधी कुणा "स्त्री हे केवळ उपभोगाचे साधन" असे मानणाऱ्या गर्भश्रीमंत दलालाचे स्त्रीत्वाच्या तेजस्वी सात्त्विकतेचे दर्शन देऊन डोळे उघडणारी कुणी युवती भेटते.
शेवटी लेखकाच्याच भाषेत सांगावस वाटत..
"समेवर येता येता प्रत्येक कथा वाचकाची 'हो' मिळवूनच थांबते."

~~* कल्याणी *~~

Saturday, 25 August 2012

रुपमहाल


आत्ताच एक छानसं लघु कथांच पुस्तक वाचून संपवलं.. त्याच रसग्रहण म्हणा किवा संक्षेपात केलेलं अवलोकन म्हणा .. माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात जुळवा जुळव करून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
ते वाचून जर पुस्तक वाचण्याची कुणाला इच्छा झाली तर माझ्या भा पो झाल्या अस समजेन.. :)

रुपमहाल

कधी टाळ्या, चित्कार, शिट्या अन चै अगद चै च्या हाके ला  'ओ' देत चिडलेल्या, त्रस्त झालेल्या, मद मस्त झालेल्या साठेमारीच्या हत्तीच्या पायी असो, 

तर कधी माळवाच्या कडावर रणरणत्या उन्हात एका प्रेमळ पण कर्तव्यनिष्ठ, कुलाची अस्मिता जपण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या बापाच्याच हाताने असो ..

किंवा कधी दुर्दैवाने दरोडेखोर ठरवलेल्या गेलेल्या क्रांतिकारी प्रियकराच्या मिठीत शिरून केवळ दिलेल्या शब्दाला जगण्यासाठी म्हणून आनंदाने बंदुकीच्या गोळ्या झेलून असो..   

तर कधी, ज्या हातांनी  झोकात शिकार करायला  शिकवली, लळा लावला,  शाबासकी दिली त्याच हातानी विष चारून अन नंतर स्वतःला संपवून असो ..

कधी मान मराताबाची, पैशाची झिंग चढलेल्या पाटलाने दिलेल्या धोक्यामुळे झालेल्या अपघाताने कुस्तीत आजारी प्रतिस्पर्ध्याच्या बरगड्या मोडल्याने असो..

वा कधी जिथे उत्कटतेने  स्वराराधना , प्रणय आराधना केली  अन तितक्याच असीम भक्तिभावाने नर्मदेला रोजचा प्रणिपात केला 
त्याच  बुरुजावर प्रियकराच्या विरहात गळी हिरकणी उतरवून असो..

अनेक रूपे पण ... शेवट एकच... मृत्यू ... आणि .. आणि .. त्या नंतर वाचकाला लागून राहिलेली अस्वस्थता हुरहूर पण त्याच बरोबर .. एक अत्युच्च प्रतिभेने ओतप्रोत भरलेली साहित्यकृती वाचल्याचे समाधान..
म्हणजे .. रणजित  देसाईचा "रुपमहाल"!  

~~* कल्याणी *~~