Showing posts with label kalyani. Show all posts
Showing posts with label kalyani. Show all posts

Friday, 3 March 2017

कुतूहल

कुतूहलाचे मज कुतूहल वाटे
किती निरागस भाव हा असे
काय कधी अन् कशास केव्हा
प्रश्नांतुनी हा जन्म घेतसे

कुतूहलाला बंध नसे
वेळ वय वा विषयाचा
होईल वेडा क्षणांत कुणीही
मित्र होई जो कुतूहलाचा

विस्मयकारक अनुभव मिळतो
पाठवुरावा याचा करिता
गरज जननी जर शोधाची
कुतूहल असे त्याचा पिता

उतू नका मातू नका
टाकू नका वसा याचा
याचीच कास धरून शेवटी
प्रत्येक प्रश्न सोडवायचा

-कल्याणी
२ मार्च २०१७
सायं ७:१५

Friday, 12 October 2012

अपूर्णता


असं नेहेमीच वाटतं, 
कि क्षितीज मला खुणावतंय..
कवेत घ्यायला उत्सुक 
बाहू पसरून हसतंय..

मीही घेऊ बघते झेप.
पण पोचत नाही तिथवर..

माझी झेप अपुरी,
कि हे फक्त मृगजळ ..?
भासमान मूर्ती सारखं
दूर दूर पळतंय..

पण असं नेहेमीच वाटतं 
कि क्षितीज मला खुणावतंय ..

~~* कल्याणी *~~

Wednesday, 11 January 2012

Drishti


पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहात एक आंधळी मुलगी मला दिसली होती..
तिला वेडीला कुठे दिसणार होता विठोबा...
पण त्यांच्या सोबत.. तितक्याच उत्साहाने तीही विठू नामाचा गजर करत जात होती..
काय चालू असेल बर तिच्या मनात..?
ते तिचे विचार माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय..

"दृष्टी"

त्याच्या डोळ्यात पाहताना म्हणे,
साऱ्या यातना विसरतात,
स्वर्गसुखाचा भास होऊन
पंचेंद्रिये सुखावतात ..

अष्टसात्विक भाव म्हणे
तेव्हा सारे अनुभवतात..
दिवस रात्र काळ वेळ
सारे काही स्थिरावतात

मलाही हा अनुभव
एकदा नक्की घ्यायचाय
पंढरीचा विठोबा
डोळे भरून पाहायचाय..

पंचप्राण वाहीन माझे
त्या दात्याच्या चरणावर..
दिली जर मला दृष्टी कुणी
फक्त एकाच क्षणभर..


-कल्याणी