Monday, 23 January 2012

आठवण

आठवणींच्या गावात जेव्हा जेव्हा जाईन मी
तुझ्या दारी क्षणभर तरी पावले माझी थांबतील... !

जाता जाता वेचीन फुले .. तुझ्या अंगणातल्या प्राजक्ताची...,
वाट माझी सुगंधी तीच फुले करतील..!

- कल्याणी
 

Tuesday, 17 January 2012

संधिकाल


तो वट-वृक्ष उभा दूर टेकडीवरचा..
मंदिराच्या कळसावर अखंड छत्रचामरं ढाळीत,
त्याच्या पानांचा संततधार अभिषेक
अगम्य अशा सळसळीत
अखंड चालू त्याची ध्यानधारणा...!

कालच्याच पावसात निखळून पडलेली
अजून एक जुनी फांदी,
तरीही त्याची तटस्थता..
जितेंद्रिय योग्याचाच हा  बाणा..!

उगवत्या दिशाभिमुख होऊन
मावळतीची वाट पाहणारा..
आयुष्याचा संधिकाल
समाधानाने अनुभवणारा..!!

- कल्याणी

Wednesday, 11 January 2012

Drishti


पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहात एक आंधळी मुलगी मला दिसली होती..
तिला वेडीला कुठे दिसणार होता विठोबा...
पण त्यांच्या सोबत.. तितक्याच उत्साहाने तीही विठू नामाचा गजर करत जात होती..
काय चालू असेल बर तिच्या मनात..?
ते तिचे विचार माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय..

"दृष्टी"

त्याच्या डोळ्यात पाहताना म्हणे,
साऱ्या यातना विसरतात,
स्वर्गसुखाचा भास होऊन
पंचेंद्रिये सुखावतात ..

अष्टसात्विक भाव म्हणे
तेव्हा सारे अनुभवतात..
दिवस रात्र काळ वेळ
सारे काही स्थिरावतात

मलाही हा अनुभव
एकदा नक्की घ्यायचाय
पंढरीचा विठोबा
डोळे भरून पाहायचाय..

पंचप्राण वाहीन माझे
त्या दात्याच्या चरणावर..
दिली जर मला दृष्टी कुणी
फक्त एकाच क्षणभर..


-कल्याणी