Thursday, 17 October 2024

मधुमालती

अधीर अवखळ 
अन्  उत्सुक किती
कोऱ्या पानी चटकन उतरली..
एकटीच..
मधुमालती..

न संदर्भ काही.. 
न प्रस्तावना ती..
वेली सख्यांना सोडून आली..
मुक्त छंद..
मधुमालती..

सुबक पाकळ्या
नाजूक देठी..
पराग अंतरी जपून आली..
धिटूकली..
मधुमालती..

अधीर कल्पना
शब्द पाकळ्या
भावार्थांचे चे पराग गर्भी..
प्रतिभेच्या देठात उमलली,
कविता की ती..
मधुमालती..?

~ कल्याणी (निकिता)
 रात्री ११:४५, 
१६-१०-२०२४



Friday, 18 June 2021

चित्र कविता - ५



निळ्या पावलांनी माझी,
वाट अडवली जेंव्हा..

गती थांबली थांबली,
जणू धरेचीच तेंव्हा..

भूत भविष्याचीही,
सूत्रे त्याच्याच हातात..

गेले नि:शंक मनी मी,
कृष्ण बाहूंच्या पाशात ..


~* कल्याणी *~
१४/०६/२०२१
१:०० दुपारी

Wednesday, 12 February 2020

चित्र कविता-४

चढणारी रात्र, उतरता प्रकाश; विझत चाललेल्या मेणबत्तीचा..

 पुन्हा तल्लफ लावणारा गंध कपातून,  संपलेल्या कॉफीचा..

आणि मनाचा हट्ट .. डायरीची नेमकी  ' तीच ' पाने वाचण्याचा..

आता रात्र चढत जाणार, मेणबत्त्या विझत जाणार, कॉफीच्या कपांची रांग लागणार..

आणि कुठेतरी पहाटे क्षितिजावर गुलाबी छटा उमटली..
डायरी मधल्या ' त्या ' पानातल्या आठवणींसारखी..
की धांदल उडणार..
रात्रीचा पसारा आवरताना..
 माझी आणि मनाची..

~* कल्याणी *~
१२/२/२०२०
पहाटे १३:२०


Tuesday, 10 December 2019

चित्र कविता -३


तुझ्या कपाळी च्या कुंकवाची धिटाई..
की तुझ्या बटांची नुस्ती अवखळ घाई,
ओठांवर आलेल्या सूहास्याच्या लाटा..
की डोळ्यातील लज्जेच्या पुसटश्या छटा,
चाफेकळी नसिकेची मोहकशी खळी..
की तुझं सौंदर्य खुलवणारी खणाची चोळी,
नक्की कशाची ग जादू करतेस तू सांग ना..
तुला पाहून क्षणातच..
दिग्मुढ होताहेत साऱ्या कल्पना..

 - कल्याणी १०-१२-२०१९ दू. १२:२५

Monday, 21 January 2019

चित्रकविता-२

चल नेऊया ती चंद्रकळी,
संभाळूनिया आज घरी. 
गुंफून टाकू काड्यांमध्ये,
बेमालूम ती नक्षिपरी

सुंदर होईल अपुले घरटे,
कवडसे रांगोळी होतील. 
शीतल सुंदर चांदणं रात्री,
प्रेमाचे क्षणही सजतील.

चमचम करतील लाख चांदण्या,
स्वप्न पिल्लांना दिसतील त्यातून. 
नक्षत्रांची ओढ लागुनी,
सातही गगने जातील लांघुन. 

फुलेल तोवर चंद्र कळीतून,
उजळून अंगण टाकील सारे.. 
सायंकाळी आयुष्याच्या,
दीप दृष्टीला हवाच ना रे!

- कल्याणी
 (२७/६/२०१८ दुपारी ३:४५)

चित्रचारोळी-१



लाट दूर गेलेली, 
उफाळून आली..
विसर्जित सारे, 
पुढे ठेवोनिया गेली..
किनारी उभा मी, 
असा स्तब्ध तेव्हा..
गाज सागराची, 
सांत्वने देत गेली..

~*कल्याणी*~
२०-१-२०१९
पहाटे ३:१५


Wednesday, 27 June 2018

चित्रकविता-१

पसरून बाहू
दिर्घ श्वास अन्,
केश मुक्त ते
डोळे मिटून,
एकरुप तू होऊ पाहशी..
न्हाऊन हिरवे वस्त्र लेउनी,
नीलाकाशी मुक्त सोडल्या,
खग केशांच्या वनराणीशी.
वर्षाघन तव उ:श्वासान्नी,
मोहरुन मग झरझर झरतील..
जल बिंदुंचा शृंगार लेऊनी,
ओलेती तू की वनराणी;
प्रश्न कठिण हा सोडवताना
मंत्रमुग्ध मी अनिमिष नयनी
रूप तुझे हे साठवताना,
कवितेतून तव चित्र रेखतो...

- कल्याणी (२७/६/२०१८ स.११:४५)