Friday, 3 March 2017

कुतूहल

कुतूहलाचे मज कुतूहल वाटे
किती निरागस भाव हा असे
काय कधी अन् कशास केव्हा
प्रश्नांतुनी हा जन्म घेतसे

कुतूहलाला बंध नसे
वेळ वय वा विषयाचा
होईल वेडा क्षणांत कुणीही
मित्र होई जो कुतूहलाचा

विस्मयकारक अनुभव मिळतो
पाठवुरावा याचा करिता
गरज जननी जर शोधाची
कुतूहल असे त्याचा पिता

उतू नका मातू नका
टाकू नका वसा याचा
याचीच कास धरून शेवटी
प्रत्येक प्रश्न सोडवायचा

-कल्याणी
२ मार्च २०१७
सायं ७:१५

Sunday, 20 November 2016

हट्टं

आज मुरली रे कान्हा 
वाजवायची नाही (ना! हि) तू 
स्वरमोहिनी रे मला 
घालायची नाही (ना! हि) तू 

घट जीवनाचे कान्हा 
अर्पियले लाटांवरी 
जेंव्हा गर्द राई तुनी 
साद तिची ऐकियेली

मोह मायेची हि वस्त्रे
वाऱ्यावरी उडो गेली 
स्वर लहरींनी जेंव्हा 
गात्र गात्र जागविली 

जीव किती दमविला 
तुला शोधता शोधता
व्यर्थ खटाटोप केला
सूर अंतरीच होता 

हात धरियेला तुझा 
आता नेई सोबती तू 
स्वरमोहिनी रे आज
घालायची नाही (ना! हि) तू 

-कल्याणी 
१२:४० पहाटे  २०/११/२०१६

Wednesday, 30 December 2015

वाह!

प्रभात समयी रवि किरणांनी
खुशाल चादर ओढून न्यावी
गर्द काजळी निशिरंगांची
सुप्त झोपल्या धरणी वरुनी ।

निळी निळाई उजळूनी यावी
क्षितीजावरी चांदी पसरावी
पुन्हा पाखरे घेत भरारी
सांतही गगना पल्याड जावी ।

तसेच काही होते रसिका ,
"वाह!" तुझी जेव्हा बघ येते
सुप्त झोपल्या प्रतिभेची मग
जणू चमचमती प्रभात होते ।

- कल्याणी कुलकर्णी
११:०६ सकाळी
३० / १२ / २०१५ 

Tuesday, 9 June 2015

विरहमला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार
माझ्या आठवणीत साऱ्या जगाला विसरत असणार

ते तळ, जिथे आपण भेटायचो
ते झाड, ज्याच्या सावलीत तासनतास बसायचो
आपल्या भेटीची साक्ष देत, अजूनही तिथेच असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

तू वेडापिसा झालास कि, ते झाडही थरथरत
तुला सहानुभूती म्हणून, अस्वस्थपणे सळसळत
माझ्या येण्याची वाट, ते हि नक्कीच पाहत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

फुलपाखरे पाहून तुला, माझे डोळे आठवतात
वार्याच्या झुळूकेत तुला, माझ्या हसण्याचे भास होतात
तुझ्या हाताला माझ्या तळव्याचे, स्पर्श नक्कीच जाणवत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

~~* कल्याणी *~~

Wednesday, 6 August 2014

अनामिका


माझ्याच कवितेला मीच त्रयस्थपणे पाहिल्यानंतर सुचलेले हे विचार..
शीर्षक काय देऊ? कविता? कल्पना? की प्रतिभा?
---------------------------------------------------------------------------------------
शब्द शब्द गुंफूनी
हे काव्य कैसे प्रसवले?
भाव माझे शब्द तुझे
एक कैसे जाहले?

 
स्पंदने माझ्या मनाची
तू कशी ग जाणीली?
हाक माझ्या अंतरीची
तू कशी हुंकारीली?

तू सखी तू..?
तू परी तू..?
की भुलवी मजला आसरा..!

तू खरी तू..?
वसशी कुठे तू...?
की फक्त माझी कल्पना..!

-कल्याणी (निकिता)

ओढ

जवळपास एका वर्षानंतर काहीतरी लिहिलंय. जरा  अपक्व वाटेल पण गोड मानून घ्या.
कविता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या धाटणी ची आहे. ओवी प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील तर नक्की दाखवा .
------------------------------------------------------------------------------------------------------

मन बेभान बेभान , उगा विचलित होई ।
सातासमुद्रापल्याड, दूर देशामध्ये जाई ।।

अरे थांब रे रे मना , नको जाऊ असा दूर ।
डोळ्यातून बरसेल, पाऊस तो झरझर ।।

कशी आवरू रे त्याला, किती विनवणी केली ।
दूर देशी रे साजन , मना ओढ ती लागली ।। 

- कल्याणी
०५-०८-२०१४
पहाटे १:१५