Friday, 3 March 2017

कुतूहल

कुतूहलाचे मज कुतूहल वाटे
किती निरागस भाव हा असे
काय कधी अन् कशास केव्हा
प्रश्नांतुनी हा जन्म घेतसे

कुतूहलाला बंध नसे
वेळ वय वा विषयाचा
होईल वेडा क्षणांत कुणीही
मित्र होई जो कुतूहलाचा

विस्मयकारक अनुभव मिळतो
पाठवुरावा याचा करिता
गरज जननी जर शोधाची
कुतूहल असे त्याचा पिता

उतू नका मातू नका
टाकू नका वसा याचा
याचीच कास धरून शेवटी
प्रत्येक प्रश्न सोडवायचा

-कल्याणी
२ मार्च २०१७
सायं ७:१५