Tuesday, 28 November 2017

सत्य कि परीकथा

रामाला बहिण होती, शांता नावाची जिला दशरथाने अंग राज्यात दत्तक दिली होती, का? तर त्याला सांगण्यात आलं होतं कि तिने एका
ऋषीपुत्राची तपस्या भंग करून त्याचाशी विवाह करावा आणि त्याला अयोध्येत आणून दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करावा.
आणि हो मंथरा दासी मानाने चांगली होती बर का.. ती या शांतेचं सांभाळ करायची आणि शांते सोबत असं सगळं राजाने केलं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तिने कट कारस्थाने करून रामायण घडवलं.

सीता हे रावणाची एका ब्राह्मण स्त्री कडून झालेली अनौरस मुलगी होती आणि तीच त्याच्या विनाशाचे कारण बनेल हे कुणीतरी सांगितल्यामुळे तिला टाकून देण्यात आली आणि मग ती शिकारीवर गेलेल्या जनकाला सापडली' आणि जानकी झाली. मग पुढे तोच रावण तिला (आपल्या मुलीला) पळवून घेऊन गेला.

वाचून धक्का बसला ?? मला तरी माहित नव्हते बुवा हे सगळे. अशातच काही पुस्तकांमधून वाचले. गेल्या वर्षात अशी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आणि माझ्या वाचनात आली. आनंद निलकंठण ची Asura- The tell of Ravana, आमिष त्रिपाठीचे Shiva Trilogy, आणि Rama Trilogy हि काही उदाहरणे. मोठी गम्मत वाटते मला या पुस्तकांची. जे वाईट ते वाईटच.. असे मानून चालणारे आपण.. पण ते का तसे? असे प्रश्न आपल्याला पडतच नाहीत. हि पुस्तके वाचून एक नवाच आयाम मिळतो लहानपणापासून ऐकत आलेल्या रामायण महाभारत आणि अशा अनेक गोष्टींना.

आता खरं सांगायचं तर या पुस्तकांवरती अगदी दोन विरोधी टोकाच्या प्रतिक्रिया मिळतात. काही जणांना हे पटतच नाही कि आपल्या पुराण कथांमधल्या  so called Negative पात्रांची काहीतरी bright side पण असू शकते. तर काही माझ्यासारख्या fantasy loving लोकांना त्या शक्यता अगदी भारावून टाकतात आणि काही ठिकाणी तर अमृत, विष, असुर, देव या सगळ्या आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टींची खूपच शास्त्रशुद्ध संकल्पना मांडली आहे या पुस्तकांमधून. लेखकाने आपली कल्पनाशक्ती वापर्लीये कि खरच खूप अभ्यास करून सत्यता मांडलीये याचा माग काढण्याची मला तरी गरज वाटत नाही. पूर्वग्रहदुषित न राहता सारासार विचार केला तर पटतात पण या गोष्टी.


असो.. वादात पडण्यापेक्षा मी तरी आपली हे पुस्तके वाचून पटलं तर  truth नाही तर fantasy समजून निखळ वाचनानंद मिळविणे पसंत करते.

-कल्याणी
२८-११-२०१७
रात्री ११.३५

कालचा वीकएंड.


शुक्रवारी माझ्या प्रिय मैत्रीण मेधावी Medhavi Joshi-Bajiraoमुळे आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला जाण्याचा योग्य आला आणि माझी १० वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली. वर सोने पे सुहागा असा काय म्हणतात तसं , हा कार्यक्रम पाहायला माझ्या सर्वात जवळच्या अशा ४ व्यक्ती सोबत होत्या. टंकसाळे काकू(मातृ स्वरूप Pratibha Tanksale), नमिता (पिल्लू स्वरूप Namita Kulkarni), मंगेश (साक्षात अहो Mangesh Vazarkar) आणि कविता(माझी जीवश्च कंठश्च सखी Kavita Patil ).
'सांग सख्या रे.. आहे का ती.. अजून .. तैशीच.. गर्द राईपरी '
संदीप खरेंची Sandeep Khare पहिली मी ऐकलेली कविता.. त्याच्या 'तिच्या'साठी लिहिलेल्या 'ति'च्या (कविताच नक्की) प्रेमात मी पडले आणि मग त्याचा असंख्य त्या (पुन्हा कविताच..)माझ्या मैत्रिणी होत गेल्या.
सरळ, सहज शब्दात सुरु होणार आशय .. लगेच लक्षात राहील अशी शब्दरचना .. अरे कित्ती सोपा आहे अशी कविता लिहिणं असा वाटत असतानाच शेवटच्या काही ओळींमधून कधी जीवघेणा वास्तव, तर कधी हृदय पिळवटून टाकणारी वेदना समोर येते आणि आपण विस्मयचकित होऊन त्या शब्दांच्या मोहिनी मध्ये असे खेचले जातो कि भानच राहत नाही कि आपण कविताच ऐकत होतो.
कधी आपलीच कुठलीतरी मनाच्या खोल खोल तळाशी कोंडून ठेवलेली दुखरी आठवण समोर आणावी , तर कधी गोड गुलाबी क्षणांच्या राज्यात फिरवून आणावं, कधी पडद्याआड दडलेल्या वास्तवाचं दर्शन अगदी नेमकेपणाने घडावं तर कधी रोजच्या रहाटगाड्यात निवांत क्षण देऊन थकल्या भागल्या मनाला सुखवावं अशी अनोखी कविता फक्त संदीप खरेच लिहू शकतात.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात Yashwantrao Chavan Natyagruha 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही' #ChalaDostahoAyushyavarBoluKahi चा सुरांसोबत जेव्हा पडदा हळू हळू सरकत गेला तेव्हाच आपण एका अनोख्या जगाची सफर करणार आहोत असा आभास निर्माण झाला. त्यानंतर शब्द, सूर, हास्यविनोद, टाळ्या, शिट्ट्या फर्माइशींची अशी जोरदार बरसात होत गेली. कुणी म्हणताय 'जा दिले मन तुला' .. तर कुणी म्हणताय 'नामंजूर '.. कुणाला 'मोर्चा ' हवाय तर कुणाला 'लव्ह लेटर '. फर्माइशींची अशी जुगलबंदी जमत गेली कि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखत नसू कदाचित.. पण अवघडलेपणा राहिलाच नाही कुठे.. आपल्याच यार दोस्तांसोबत गप्पांचा फड रंगवलाय असा वातावरण तयार झालं.. खरंच इतकी जादू आहे संदीप खरेंच्या कवितांमध्ये आणि सलील कुलकर्णींच्या Saleel Kulkarni Official सुरांमध्ये कि त्या शुक्रवारच्या संध्याकाळनंतर आलेली शनिवार आणि रविवार ची सुट्टीपण त्या कवितांच्या ओळी गुणगुणत वेगळ्याच आनंदलहरींनी भारून राहिली.

- कल्याणी
२७-११-२०१७
सायंकाळी ६:३० 

Friday, 3 March 2017

कुतूहल

कुतूहलाचे मज कुतूहल वाटे
किती निरागस भाव हा असे
काय कधी अन् कशास केव्हा
प्रश्नांतुनी हा जन्म घेतसे

कुतूहलाला बंध नसे
वेळ वय वा विषयाचा
होईल वेडा क्षणांत कुणीही
मित्र होई जो कुतूहलाचा

विस्मयकारक अनुभव मिळतो
पाठवुरावा याचा करिता
गरज जननी जर शोधाची
कुतूहल असे त्याचा पिता

उतू नका मातू नका
टाकू नका वसा याचा
याचीच कास धरून शेवटी
प्रत्येक प्रश्न सोडवायचा

-कल्याणी
२ मार्च २०१७
सायं ७:१५