Sunday 23 December 2012

"आठवणी चं गो च्या "


मैत्रिणीसोबत झालेलं छोट्टस भांडण, गणिताची वर्ग परीक्षा किंवा उगाचच आवडणारा "तो" वर्गात उपस्थित नसणं या तीनही गोष्टी सारख्याच वेदनादायक असतात त्या काळात म्हणजे so called "teenage " मध्ये मला चं गो भेटले,
अर्थात "मी माझा" मधून. आणि हा मोहक खळी असलेला, घाऱ्या बोलक्या डोळ्यांनीच घायाळ करणारा कवी हाच माझा "first crush" हे मी declare करून मोकळी झाले.

त्या वेळी त्या चारोळ्यांचा अर्थ असा कितीसा कळायचा देव जाणे, पण "मी माझा", आणि "पुन्हा मी माझा" वाचणे हा माझा केवळ छंद न राहता गरज झाली. कदाचित तेव्हाच्या बाळबोध अस्मादिकांनी त्या चारोळ्यांचे काहीसे बाळबोध अर्थच लावले असतील.
पण कारण काहीही असो जरा "mood off " झाला कि हि झिपरी पोर हि पुस्तके घेऊन जिन्यात धुसमुसत बसायची.
उन्हाळ्यात माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीसोबत आख्खी दुपारभर "मी माझा" आणि "पुन्हा मी माझा" ची पारायणं झाली आणि आम्ही चं गो ची भाषा बोलायला लागलो.


"गप्पच रहावसं वाटतं
तुझ्या जवळ बसल्यावर
वाटतं तूच सगळं ओळखावस
मी नुसतं हसल्यावर "

हि चारोळी ३ तास गप्पा मारून झाल्यावर आम्ही एकमेकीना dedicate केल्याचं पण आठवतंय.

नंतर हळू हळू एकएक चारोळीचा  अर्थ समजत उमजत गेला  आणि तेव्हाच्या "just crush " च्या चारोळ्यांच्या मी प्रेमात पडले.

"चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं " या चारोळ्या वाचल्यावर..
पहा मी अजूनही तीच भाषा बोलतीये... 

"ते" म्हणतात असं ,
"मनाची तहान
पाण्याने भागात नाही,
ते बरं आहे की सगळ्यांनाच,
मनाची तहान लागत नाही "

त्या काही लोकांना हि तहान भागवणारा अमृतकलश सापडलाय हे कुठे ठावूक आहे "चं गो" ना  :)

- कल्याणी (निकिता कुलकर्णी)

पहाटे १.१९
२३-१२-२०१२

Wednesday 5 December 2012

निरोप ..


पापण्यांच्या पाकळ्यांवर जमलेले दव
ओघळत राहिले हळुवार ..
कित्येकदा, त्या वेळी ..

दाटलेल्या कंठात शब्दांची  गर्दी
अडखळली  वाक्ये
कित्येकदा त्या वेळी ..

थरथरत्या मनात, भावनांचा प्रपात
लपवले कंपित हात,
कित्येकदा त्या वेळी..

अखेरची नाही भेट, जुळतील वाटा पुन्हा
समजावले मनाला,
कित्येकदा त्या वेळी..

चिडलो, रडलो, हसलोही जरा खिन्नपणे,
नेमका निरोपच घ्यायचा राहिला ..
अखेरचा .. त्या वेळी ..

-कल्याणी
पहाटे १:४५
05/12/2012


टिप : 'Life of Pi' चित्रपटातील एका प्रसंगाने प्रेरित !