Tuesday, 21 February 2012

मैत्री

(या कवितेसाठी मला प्रस्तावनेची गरज वाटत नाही .. शीर्षकातच सारं काही समजतं, उमजतं...!!)
 
अनेकरंगी छटा घेऊन नटलेली रोजचीच पहाट
जशी रोजच वेगळी वाटते
तशी नवलाई तुझ्या माझ्या मैत्रीची..!

दरवेळी नव्या विश्वात सैर करवणाऱ्या
मदिरेच्या व्यसनासारखी..
पण..
आभाळभर स्वैर भिरभिरला तरी
जमिनीशी बांधून ठेवणाऱ्या
पतंगाच्या दोरीसारखी..!

तर कधी ,
कितीही कुरकुर केली तरी
संध्याकाळी परतीची वाट पाहणाऱ्या
प्रेमळ आश्वासक अशा
जुन्या कडेकोट दारासारखी..!

उमलत्या पाकळ्याप्रमाणे  उलगडत गेली आपली सोबत..
प्रत्येक पाकळीसोबत गहिरत गेले आपल्या मैत्रीचे रंग,
अन आता.. आयुष्यभर दरवळेल अशा
आठवणीच्या परीमलाने भरून राहिलाय..
तुझा माझा आसमंत....!!

-- कल्याणी